मार्गदर्शनाची खुबी

- महाराजांनी आपल्या अनुयायांवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले.
- ते स्वतः कडक शिस्तीचे नव्हते. पण त्यांनी कोणाचीही गैरवागणूक चालू दिली नाही.
- योग्य मार्गदर्शन करण्यासाठी लागणारा सारासारविचार, धोरण, युक्ति, जवळची वाट, सहानुभूति इ. सर्व गुण त्यांच्यापाशी होते.
- एकदा त्यांनी एखाद्या माणसाला जवळ केला की त्याचे त्यांनी सर्व सोसले...अगदी अपवाद सुध्दा. त्यामुळे त्यांचा माणूस त्यांना सोडून कधी गेला नाही.
- महाराजांनी पूर्वपरंपरा कधी सोडली नाही. "मागच्या लोकांनी जे जे चांगले व उपयुक्त करुन ठेवले आहे ते आपण का वाया घालवायचे? म्हणून जुने कायम ठेवून त्यामध्ये चांगल्या नवीन गोष्टींची भर घालावी. प्रत्येकाने आपले जीवन पूर्ण रसमय बनवले पाहिजे." असे ते सांगत.
- आचार, विचार व उच्चार यामध्ये संगती ठेवून जे जे भगवंताकडे नेणारे असेल त्याचा पुरस्कार करावा आणि भगवंतापासून दूर नेणारे असेल त्याची उपेक्षा करावी. असेही ते सांगत.
- ते म्हणत, " भरपूर खावे, प्यावे, भरपूर खेळावे, हसावे, रमावे पण त्यामध्ये भगवंताला विसरू नये."
- महाराजांनी आपल्या चारित्र्याने लोकांना धडा घालून दिला. विचाराने संसाराचे अंतरंग शोधून काढायला शिकवले. भगवंताच्या निष्ठेने जीवनातील बर्‍यावाईट प्रसंगांना टक्कर देण्यास तयार केले. संस्कृतीचे व धार्मिकपणाचे बीज मनात रोविले. आपल्या प्रत्येक माणसाला आत्मोन्नतीच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त केले.
- जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव असल्याने हाती आहे तोपर्यंत प्रत्येकाने भगवंताचा शोध घ्यावा, भगवंताच्या नामाचा आधार धरुन सर्वांनी भगवंताच्या आनंदाचा अनुभव घ्यावा यासाठी ते आयुष्यभर खटपट करीत होते.
- त्यांनी लोकांना शिकवण्याचा कधी वीट मानला नाही.
- कष्ट करताना ते कधी त्रासले नाहीत.
- त्यांनी कोणाला पिडलं नाही.
- दुसर्‍याचं उणं पाहून ते कधी हसले नाहीत.
- कोणाचं उणं त्यांनी त्याच्या मागे काढलं नाही.
- शरण आलेल्या निंदकाला त्यांनी कधी दूर लोटलं नाही.
- स्वतःच्या प्रौढीची गोष्ट त्यांनी कधी सांगितली नाही.
- आलेल्या माणसाला खायला घातल्याशिवाय त्यांनी कधी जाऊ दिला नाही.
- स्वतः सिध्द होते पण त्यांनी कधी साधन सोडलं नाही.
- त्यांनी आपली विरक्त व निरपेक्षवृत्ति कधी सोडली नाही.
- भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताचे नाम सोडून दुसरे साधन कधी सांगितले नाही.

॥श्रीराम समर्थ॥