परमार्थ व प्रपंचाची सांगड

- तत्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ त्या तत्वाच्या आचरणामध्येच समजतो अशी महाराजांची ठाम भूमिका होती.
- वेदान्ताची प्रमेये किंवा भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता.
- परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असे ते नेहमी सांगत.
- महाराजांनी प्रपंच व परमार्थाची विलक्षण जोड आपण स्वतः घालून दाखवली. म्हणून ते लोकांना सांगत असताना कधी निराश झाले नाहीत.
- त्यांचा पिंड भगवंताच्या प्रेमाचा असल्याने प्रपंचामध्ये ते प्रेम कसे अनुभवायचे याचे विवेचन ते मनाच्या तळमळीने करीत.
- ते सांगत की," घरच्या माणसांना कधी दीनवाणे ठेवू नये. त्यांची कधी आबाळ करू नये."
- ते म्हणत की," ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही".
- हसतखेळत, न कळत, प्रापंचिक गप्पागोष्टी करत परमार्थाची तत्वे ते खुबीने समजावून सांगत.
- बोलताना सौजन्य व प्रेमळपणा ओसंडून वाहे.
- त्यांचे उदात्त विचार ऐकल्याने श्रोत्याच्या विचारांना जोराची चालना मिळे व कालानंतर विचारांत व आचारांत क्रान्ति घडून येई.
- हजारों लोक त्यांच्या संगतीला राहून गेले. प्रत्येकाशी त्यांची निकटची ओळख होती. त्यांचे घर प्रत्येकाला प्रेमाच्या हक्काचे वाटे.
- अनेक दीन, दरिद्री, अज्ञानी, भाबड्या व अपंग लोकांना त्यांचाच आधार होता.
- आपल्या संगतीला येणार्‍या प्रत्येकाला भगवंताच्या निष्ठेचे म्हणजे नामाचे महत्व कळावे यावर त्यांचा कटाक्ष होता.
- कोणीही कसाही असला तरी सर्वांशी महाराज प्रेमाने वागले.
- भगवंताच्या नामाचे महत्व अगदी शांतपणे ते सांगत राहिले.

॥श्रीराम समर्थ॥