समाजजीवनाचा अभ्यास

महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते पंचेचाळीसाव्या वर्षांपर्यंत कल्पनातीत प्रवास केला.
या प्रवासामध्ये त्यांना त्या काळातील भारतातील समाजजीवन पहायला मिळाले.
महाराजांची दृष्टी मूलगामी, व्यापक व सूक्ष्म असल्याने त्या वेळच्या लोकांची स्थिती समजणे सोपे गेले.
त्यांच्या असे लक्षात आले की -
- समाजातील सुबुध्द, श्रीमंत, सत्तधारी व पुढारी अत्यंत स्वार्थी व विषयलोलुप झालेले आहेत.
- अडाणी, गरीब व सामान्य जनतेच्या दुःखाला पारावार नाही.
म्हणून त्यांनी मध्यम व गरीब स्थितीतील प्रपंची लोकांना हाताशी धरले. ते त्यांच्यात मिसळले. त्यांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईने पाहिले. त्यांच्यामध्येच राहून त्यांनी त्यांना परमार्थात पुढे ढकलले. महाराज मूर्तिमंत करुणाबुध्दी होते. अनेक वर्षे सांगून व त्यांचे कष्ट सोसून सुध्दा प्रापंचिक लोक पुन्हा मूलपदावर येतात असा वारंवार अनुभव येऊन सुध्दा महाराजांनी आपले काम सोडले नाही.
ते प्रापंचिकांवर कधी रागावले नाहीत.
महाराजांनी आपले शरीर, मन, बुध्दी, वाणी, घरदार, शेतीवाडी आपल्याजवळच्या सर्व शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लावल्या.
त्यांनी सर्व काम अत्यंत चिकाटीने, संथपणे व गाजावाजा न करता केले.
- "एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसे थोडीतरी पुढे जाणे हे चांगले", असे ते म्हणत.
- समाजातील कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया व पुरुष यांच्या ठिकाणी तपस्वांमध्ये सापडेल अशी भगवंताची निष्ठा निर्माण झाली.
- त्यांनी कधी कोणाचा अव्हेर केला नाही.
- समाजातील ओंगळ, उपेक्षित, निषेधाला योग्य व अत्यंत स्वार्थी लोकांविषयी त्यांनी कधी तुच्छता दर्शवली नाही.
- ते कोणाही माणसाच्या भवितव्याविषयी कधी निराश झाले नाहीत.
- कोणीही माणूस त्यांच्यापाशी गेला तरी त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असे.
- कित्येको वर्षे दिवसांतून १८-२० तास आलेल्या माणसांशी संभाषन करुन त्याचे समाधान महाराज करून देत असत.

॥श्रीराम समर्थ॥ -