तत्वज्ञान

- महाराज अद्वैतवादी होते.
- त्यांचे म्हणणे असे होते की परमात्मस्वरुपाचे ज्ञान करुन घेणे हे प्रत्येक माणसाचे या जगातले पहिले कर्तव्य आहे. परमात्मा सर्वव्यापी आहे, म्हणून तो प्रत्येक प्राण्याच्या हृदयात आहे; त्यामुळे आपण आपल्या हृदयातला परमात्मा ओळखला की सर्वव्यापी परमात्मा आपोआप समजतो. म्हणून खरा "मी" कोणता हे ओळखणे याचे नाव ज्ञान होय. खरा "मी" परमात्मस्वरुप असूनसुध्दा त्याच्यावर खोट्या "मी" चे आवरण पडल्यामुळे माणूस देहालाच मी मानतो. बाहेरील दृश्यामध्येच सुख आहे असे त्याला वाटते. ते अपूर्ण असल्याने माणूस कधीच सुखी होत नाही. "देही मी" हा अहंकार नाहीसा करण्याकरीता भगवंताचे अनुसंधान हाच मार्ग आहे. त्याच्या नामाने त्याचे अनुसंधान टिकणे सोपे जाते. माणसाने प्रपंच न टाकता नामाचे अनुसंधान ठेवावे. आपले कर्तव्य करण्यास कधी चुकू नये. त्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने ते स्वीकारावे. भगवंताच्या इच्छेनेच सर्व सूत्रे हलतात हे लक्षात ठेवावे. माणसाने सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये. देहाला उगीच कष्टवू नये, काही झाले तरी भगवंताचे नाम सोडू नये. हे सर्व सत्संगतीने शक्य होते. संताची संगतही भगवंताचे नाम सतत घेतल्यानेच मिळते.
- हे सर्व तत्वज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये पूर्णपणे उतरलेले असे महाराज संतपुरुष होते.
- त्यांची प्रत्येक कृती व उक्ति या विशिष्ट तत्वज्ञानाच्या पायावर योजनापूर्वक आखलेली होती.

॥श्रीराम समर्थ॥