मृत्यूनंतरचे पहिले वर्षअकराव्या दिवसापासून ते १ वर्ष होईपर्यंत -

अकरावा व बारावा दिवस – या दिवशी हा तहानलेला व भुकेलेला देह जेवण करतो.

तेरावा दिवस – यमदूत हातपाय बांधलेल्या माकडाप्रमाणे बंदिस्त स्थितीत त्याला घेऊन जातात.

यममार्गापर्यंतचा प्रवास -

हातपाय बांधलेलं हे प्रेत यममार्गावर दिवसरात्र १ वर्षभर चालत राहातं. हे अंतर २४७ योजने इतकं असतं. ह्यामध्ये एकूण १६ शहरं (पुरी) लागतात. ह्या मार्गाच्या अंती ते धर्मराजाच्या घरी जातं.

 

यमदूत पापी जीवाला कशा प्रकारे घेऊन जातात? -

यमदूत त्या जीवाला दोर्‍यांनी बांधतात, अंकुशांनी टोचतात, नाकामध्ये वेसण अडकवतात, कानामध्येही अडकवतात, त्याचे केस पकडून त्याला खेचत नेतात, मान – दंड – पावले - पाठ यांना साखळ्यांनी बांधतात आणि चाबकाने मारत मारत नेतात.

 

अशा वेळेला जीवाला होणारा पश्चात्ताप -

आपण असं काय केलं म्हणून आपल्याला अशी शिक्षा व्हावी”, याविषयी तो जीव विचार करू लागतो, मुलं, बाळं, नातवंडांची आठवण काढतो, खूप रडतो. स्वत:शी म्हणत राहातो, “मोठ्या पुण्याने मला मनुष्यजन्म मिळाला होता. तो मिळूनही मी धर्माचरण केले नाही, मी दानं दिली नाहीत, मी अग्नीमध्ये हवन केलं नाही, तप केलं नाही, देवांची पूजा केली नाही, तीर्थयात्रा केल्या नाहेत, ब्राह्मणपूजन केलं नाही, गंगास्नान केले नाही, संतसज्जनांचा सहवास मिळवला नाही, कोणाला मदत केली नाही, उजाड वाळवंटांमध्ये पशूपक्षीमाणसांसाठी पिण्याच्या पाण्याची तळी बनवली नाहीत, गाईब्राह्मणांसाठी काही केलं नाही, वेदशास्त्रांना मानलं नाही, पुराणे ऐकली नाहीत, ज्ञानी पुरुषांची पूजा केली नाही, मी मालकाच्या आज्ञेचं पालन केलं नाही, त्याच्या हिताचं चिंतन केलं नाही, गुरुजनांचा आदर केला नाही.”

हाच जीव जर विवाहित स्त्री असेल तर ती म्हणते,

() “पतीची सेवा करणे हा स्त्रियांचा परमधर्म आहे, हे माहीत असूनही मी पतिसेवा केली नाही,

() वर्षभरातल्या व्रतांचे मी पालन केले नाही.”

अशा प्रकारे जीव वायूच्या वेगाने सतरा दिवस चालत राहातो. अठराव्या दिवशी हे प्रेत सौम्यपूरला पोहोचते. या सौम्यपूरचे रहिवाशी व यमदूत या प्रेताला उपदेश करतात. या ठिकाणी मासिक श्राद्धाचे पिंड खातो.

अशा प्रकारे दर महिन्याला वेगवेगळ्या पुरांना जात, विश्रांती भोगत, प्रत्येक महिन्याचे पिंड खात खात प्रवास करत राहातो.

ह्या मार्गावर झाडांची सावली नसते की त्या सावलीत बसून जीव विश्रांती घेऊ शकेल. अन्न, पाणी त्याला मिळत नाही, त्यामुळे तो तहानभुकेने व्याकूळ होतो. या मार्गावर इतकी प्रचंड उष्णता असते की जणू प्रलयच आलाय की काय असं वाटावं. वाटेत त्याला काटे टोचतात, विषारी साप चावतात, शिकारी, सिंह, वाघ, कुत्री खातात. वाटेत घोर असिपत्रवन लागते. कावळे, घुबडं, गिधाडं, मधमाशा आणि डासांनी भरलेल्या ह्या वनात जागोजागी आग लागलेली असते आणि त्या झाडांच्या काटेरी पानांमुळे त्या जीवाला अनेक ठिकाणी जखमा होतात. कधी तो अंधार्‍य़ा विहीरीत पडतो, कुठे तो उंच पर्वतावरून पडतो, कधी त्याला तीक्ष्ण धारेवरून, खिळ्यांवरून चालावं लागतं, कधी भयंकर अंधारात धडपडायला होतं, तापलेल्या चिखलावरून तो घसरून पडतो, कधी तापलेल्या वाळूवरून पाय पोळत जावं लागतं, काही ठिकाणी गरम निखार्‍यांच्या ढिगावरून चालावं लागतं, तर कधी भयंकर धुराने भरलेल्या रस्त्यावरून कडमडत चालावं लागतं. कधी अंगावर दरडी कोसळतात. काही ठिकाणी रक्त, शस्त्र, भयंकर गरम पाण्याच्या पावसातून जावं लागतं. कधी खोल गुहांमधून जावं लागतं. वाटेमध्ये मलमूत्रांनी भरलेली कुंडं असतात. या मार्गावर मध्यभागी वैतरणा नदी वाहाते. तिला पाहूनच दु:ख आणि भीती वाटते. ही १०० योजने रुंद आहे. रक्त आणि पुवाने ती भरलेली आहे. तिच्या किनार्‍यावर हाडांचे ढिगारे अहेत. रक्तामांसांचा चिखल तिच्यामध्ये आहे. भयंकर मगरी आहेत. भयानक प्रकारचे पक्षी वर घिरट्या घालत असतात. पापी जीवाला आलेलं बघून ही नदी अशी उकळू लागते की जणू काही कढईमध्ये तूप उकळते आहे. ह्या नदीमध्ये मांसाहारी जलचर राहातात. हिच्या धारेमध्ये पडलेला पापी जीव आपल्या नातेवाईकांच्या नावाने हाका मारत राहातो. बरेचदा हिला फ़क्त बघूनच त्याला बेशुद्धी येते. या नदीमध्ये असंख्य फ़ुरशी, विंचू आणि काळे साप असतात. यातल्या भोवर्‍यांमध्ये सापडून तो पार पाताळापर्यंत जातो परत गरगर फ़िरत वर येतो.

मग एक वर्ष संपते आणि मग वार्षिक श्राद्धाचे पिंड तो खातो.

यमराजाचे घर जवळ आल्यावर शेवटच्या पुरात तो आपले हाताएवढे शरीर सोडून देतो.

पुढच्या कर्मांचा भोग घेण्यासाठी आकाशातून जाता येण्याजोगा अंगठ्याएवढा देह धारण करून तो यमदूतांबरोबर जातो.

संदर्भ - गरूडपुराण

॥श्रीराम समर्थ॥