अक्षरब्रह्मयोग (अध्याय ८)

मी एक साधनी -
महाराज, भगवंताने सांगितलेल्या आठव्या अध्यायातील अक्षरब्रह्मयोग म्हणजे काय?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
हा योग म्हणजे प्रथम ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत व अधिदैव, अधियज्ञ यांना जाणणे, व युक्तचित्त होणे.
ब्रह्म – परम अक्षर (ॐ)
अध्यात्म – आपले स्वरूप म्हणजे जीवात्मा असे जाणणे
कर्म- भूतांचे भाव उत्पन्न करणारा त्याग म्हणजे कर्म
अधिभूत – उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत हे जाणणे.
अधिदैव – हिरण्मय पुरुष अधिदैव आहे जे जाणणे
अधियज्ञ – या शरीरात भगवंतच वासुदेव अंतर्यामी रुपाने अधियज्ञ आहे हे जाणणे.

मी एक साधनी -
हे अक्षरब्रह्मपद कोणाला मिळते?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की - "अंत:काळी जो माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करतो तो मलाच (अक्षरब्रह्मपद) प्राप्त करून घेतो यात कोणताही संशय नाही. मनुष्य अंतकाळी ज्या भावाचे स्मरण करतो तो त्या भावातच जाऊन विलीन होतो, कारण तो नेहमी त्याच भावात असतो. मन व बुद्धी माझ्या ठायी अर्पण करणारा नि:संशय मलाच येऊन मिळतो ”.

मी एक साधनी -
भगवंताला किंवा परम (दिव्य) पुरुषाला (अक्षरब्रह्मपदाला) कोण प्राप्त करून घेतो?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
जो अविचलित चित्ताने, अभ्यासयुक्त होऊन, भगवंताचे निरंतर चिंतन करीत असतो, जो मनुष्य अंत:काळी अविचल मनाने, योगबलाने, भुवयांमध्ये प्राणांची योग्य स्थापना करून सतत ध्यान करतो तो मनुष्य या दिव्य परमपुरुषाला (अक्षरब्रह्मपदाला) प्राप्त करून घेतो.

मी एक साधनी -
हा परमपुरुष कसा असतो?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
परम (दिव्य) पुरुष सर्वज्ञ असतो, तो पुरातन आहे, तो सर्वांचा नियंता आहे, तो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, तो सर्वांचा आधार आहे, तो अचिंत्यरूप आहे, तो सूर्याप्रमाणे तेजस्वी (आदित्यवर्णम्‌) आहे, तो तमाच्याही पलिकडचा आहे.

मी एक साधनी -
महाराज, हे परमपद कसे आहे?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
वेदवेत्ते याला अक्षरब्रह्म म्हणतात, यती विरक्त (वीतराग) होऊन यात प्रवेश करतात, याच्या प्राप्तीची इच्छा करणारे ब्रह्मचर्यव्रताचे आचरण करतात.

मी एक साधनी -
हे अक्षरब्रह्मपद कसे प्राप्त करतात?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, "इंद्रियरूपे देहाची सर्व द्वारे बंद करून, मनाला हृदयप्रदेशात स्थिर करून (संयम), प्राणाला मस्तकात स्थापन करावे, परमात्म्याशी योगधारणेत स्थित व्हावे , ॐ या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत राहावे. असे माझे चिंतन करीत असताना देहत्याग झाला असता परमगति, अक्षरब्रह्मपद प्राप्त करून घेता येते.”
भगवंतांनी अनन्यप्रेमाने परमपद मिळवण्यासाठी सुलभमार्ग ही सुचवला आहे. ते म्हणतात “ माझ्या ठिकाणी अनन्यचित्त व्हावे, नित्य सतत माझे स्मरण करावे, माझ्याशी नित्य युक्त व्हावे, अशा योग्यासाठी मी सुलभतेने प्राप्त होतो. (अर्जुनाला सूचना - तू हे सर्वकाली माझेच स्मरण कर आणि सर्व कर्मे मलाच अर्पण कर.)”

मी एक साधनी -
या अक्षरब्रह्मयोग्यांना कोणते फ़ल मिळते?
माझ्या मनातील सद्‌गुरू -
त्यांना परमपद मिळते ते कसे ते ऐक..
दु:खांचे आगर असलेल्या क्षणभंगूर असा पुनर्जन्म या योग्यांना नाही. ब्रह्मापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत कारण ते कालाने मर्यादित आहेत. मात्र भगवंताला प्राप्त करून घेतल्यावर पुनर्जन्म होत नाही कारण भगवंत कालातीत आहे.
ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगाची आहे. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होतात. सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात लीन होऊन जातात. अशा प्रकारे भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न व विलीन होतो.
त्या अव्यक्ताहून फार पलिकडचा दुसरा सनातन नावाचा अव्यक्त भाव आहे. तो सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. त्यालाच अव्यक्त अक्षर असे म्हणतात. तिलाच परमगती म्हणतात. या भावाला प्राप्त करून घेतल्यावर मनुष्य परत येत नाही. तेच भगवंताचे परमधाम आहे.
योगी हे समजतो की एकूण दोन काल (गती) आहेत. एक शुक्ल व दुसरा कृष्ण. शुक्ल मार्गात ज्योतिर्मयी अग्नी, दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायण यांच्या देवता आहेत. या मार्गाने गेलेले ब्रह्मविद ब्रह्माला प्राप्त करून घेतात. ते पुन्हा परत येत नाहीत. कृष्ण मार्गात धूम, रात्री, कृष्णपक्ष, दक्षिणायन यांच्या देवता असतात. या मार्गाने गेलेला मनुष्य चंद्रतेजाला प्राप्त होऊन पुन्हा परत येतो. या दोन्ही मार्गांना जाणणारा योगी मोह पावत नाही. म्हणून सर्व काळी योगयुक्त व्हावं.
योगी पुरुष हे सर्व जाणून यज्ञ, तप, दान यांनी मिळणार्‍या पुण्यफलाला उल्लंघून जातो व आद्य अशा परम स्थानाला प्राप्त करून घेतो.

॥श्रीराम समर्थ॥